भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

    




राज्यामध्ये सन १९९० पासून रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड योजना राबविण्यात आली असून सदर योजनेअंतर्गत अर्थसहाय्य देणे टप्प्या-टप्प्याने बंद केले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत "जॉबकार्ड धारण करणारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आणि अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी" फळबाग लागवडीकरीता दोन हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत अनुदानास पात्र आहेत. सबब, राज्यामध्ये ऐंशी टक्के अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी असूनही, जॉबकार्ड नसल्याने ते सदर योजनेचा लाभ मिळण्यास अपात्र ठरत आहेत. तसेच केंद्र शासनाने सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे निश्चित केले आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने सहाय्यभूत ठरणार आहे. तसेच योजनेच्या माध्यमातून पीक व पशुधन याबरोबरच फलबागेच्या रूपाने शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण होणार आहे. त्याचप्रमाणे फळबाग लागवडीमुळे नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करून काही प्रमाणात हवामान बदल व ऋतू बदलाची दाहकता व तीव्रता सौम्य होण्यास मदत होणार आहे.

     उपरोक्त पार्श्वभूमीवर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राज्यात राबविण्यात येत आहे.


लाभार्थी पात्रता

१. योजनेअंतर्गत वैयक्तीक शेतकऱ्यांनाच लाभ घेता येईल. संस्थात्मक शेतकऱ्यांना लाभ घेता येणार नाही.

२. शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावे ७/१२ असणे आवश्यक आहे.

३. जर ७/१२ उताऱ्यावर लाभार्थी संयुक्त खातेदार असेल तर खातेदारांचे फळबाग लागवडीसाठी संमतीपत्रक आवश्यक राहील.

४.  सर्व प्रवर्गाअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची उपजीविका केवळ शेतीवर अवलंबून आहे त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. 

५. प्राप्त झालेल्या अर्जामधून लाभार्थ्यांची निवड करतांना अनुसूचित जाती/जमाती अल्प व अत्यल्प भूधारक, महिला, दिव्यांग व्यक्ती यांना प्राधान्य देण्यात येईल.

६. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत पात्र न ठरणारे शेतकरी या योजनेत पात्र असतील. 

क्षेत्र मर्यादा 

या योजनेअंतर्गत फळबाग लागवडीकरता कोकण विभागासाठी किमान ०.१० हेक्टर ते कमाल १० हेक्टर तर उर्वरित विभागासाठी किमान ०.२० हेक्टर ते कमाल ६ हेक्टर क्षेत्र मर्यादा अनुज्ञेय राहील.


अनुदान

१०० टक्के

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास एकूण ३ वर्षाच्या कालावधीत ५०:३०:२० प्रमाणे अनुदान देण्यात येईल.

लाभार्थ्यांने लावलेली फळझाडे पहिल्या वर्षी किमान ८० टक्के तर दुसऱ्या वर्षी ९० टक्के जगविणे आवश्यक राहील.


अर्ज कुठे करावा

https://mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाइट वर ऑनलाईन अर्ज करावा.


आवश्यक कागदपत्रे 

१. ७/१२ उतारा

२. ८ अ खाते उतारा 

३. सामायिक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्रक

४. आधार कार्ड

५. आधार लिंक असलेला बँक खाते क्रमांक 

फळबाग लागवड अंतर व अनुदान हे प्रतीहेक्टर फळपिकानुसार वेगवेगळे राहील.


Comments

Popular posts from this blog

राजर्षी शाहू महाराज सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ

विश्वकर्मा योजना अवघ्या ५ टक्के व्याजाने लाखभर कर्ज

सुकन्या समृद्धी योजना